अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक

 अंतर नक्की कुठले सामाजिक की शारीरिक...

प्रा. अलोक पवार

सध्या या कोरोना काळात कोरोनाची लागण होऊ नये म्हणून दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवून राहा असे सांगितले जाते आहे. आणि हे अंतर ठेवताना इंग्रजी मध्ये Social Distance व त्याचे मराठी मधून भाषांतर म्हणजेच सामाजिक अंतर ठेवा असे म्हणले वापरले जाते आहे. म्हणजे दोन व्यक्तींमध्ये अंतर ठेवणे खरेच अत्यावश्यक आहे. ज्याची अत्यंत गरज देखील आहे. पण त्याच्या पुढे सामाजिक हा शब्द वापरणे अत्यंत चुकीचा वाटतो. 



मागे आपल्या माननीय पंतप्रधान यांनी लॉकडाउन जाहीर केल्यावर टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, दिवा लावा असे नानाविविध कार्यक्रम घेतले. मानसशास्त्रीय दृष्ट्या हे सर्व उपक्रम अतिशय स्तुत्य होते कारण प्रत्येक घरातील व्यक्ती यामध्ये सहभागी होऊन दुसऱ्याला जणू सांगत होता की आपण सर्व एकसाथ आहोत. यावेळी गरीब - श्रीमंती ची भावनाच जणू नव्हती कारण सर्व स्तरावरून सहभागी झाले होते. यावेळी आपण एक सामाजिक बांधिलकी जपली होती असे म्हणायलाया हरकत नव्हती. आपण त्या कोरोना योध्यांंच्या समर्थनार्थ हे सर्व केले. मी इथे सामाजिक बांधिलकी शब्द वापरतो आहे. जी आपण आपल्या आपल्या घरी बसून चोख पाळली. 

मग आपण जे सध्या एकमेकांपासून लांब राहतो आहे ते सामाजिक अंतर कसे होऊ शकते ते शारीरिक अंतर ना. कारण आपण सध्या जरी एकमेकांपासून लांब असलो तरीही सामाजिक दृष्ट्या एकमेकांजवळ आहोत. आम्ही शिक्षक लोक झूम किंवा गूगल मिट द्वारे लेक्चर घेऊन एकमेकांच्या जवळ आहोत. घरी बसून काम करणारे आपला चोख रिपोर्ट आपल्या बॉस ला ईमेल च्या माध्यमातून देत आहेत. तसेच नातेवाईक मित्रमंडळ आपल्याला व्हाट्सअप्प व्हिडिओ कॉल किंवा फेसबुक इन्स्टाग्राम च्या माध्यमातून भेटत आहेत. 

आपण एखादा व्यक्ती समाजाप्रती उत्तम काम करीत असेल तर त्याला काय उत्तम social work म्हणजेच उत्तम सामाजिक कार्य करतो आहे असे म्हणतो. मग सध्याच्या काळात देखील बरेच जण आपले सामाजिक भान जपून कार्य करीत आहेत. ते समाजाच्या जवळ आहेत. कुठे ते गरिबांना अन्नदान करीत आहेत तर कुठे ते त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचवत आहेत. हे सर्व करताना ते फक्त याच भान देखील ठेवत आहेत की मास्क घालणे बंधनकारक आहे तसेच निदान सुरक्षित अंतर ठेवणे देखील गरजेचं आहे. हे अंतर मीटर मध्ये मोजले जाते आहे. मग त्याला शारीरिक अंतर म्हणणे योग्य राहील.

सामाजिक अंतर ठेवणे हे असे संबोधित करणे हे माणसाला माणसापासून दूर नेण्यासारखे आहे. आधीच्या काळी जातीभेद, वर्णभेद आणि अगदी लिंगभेद यांसारख्या गोष्टींच्या मूळे व्यक्ती सामाजिक अंतर ठेवून राहायची. मग सध्या पण आपण तेच करावे का? अजिबात नाही आपण आता निदान मनाने एकत्र आहोत हे सांगण्यासाठी 'सामाजिक अंतर' हा शब्दच मुळात खोडीत काढून त्याला योग्य दृृष्टीने शारीरिक अंतर  Physical Distance असे म्हणणे योग्य ठरेल. चला हा बदल अमलात आणू कारण आपल्याला सामाजिक अंतर अजिबात ठेवायचे नाहीये सुरक्षित असे शारीरिक अंतर ठेवायचे आहे.

Comments

Popular posts from this blog

मंदिरे किंवा कोणतीही धार्मिक स्थळे उघडण्याबाबत मला काय वाटते?